बेळगाव—belgavkar : इ. स. 1160 च्या सुमारास गोवा प्रांतावर कदंबांचे राज्य होते. या कदंबाच्या एका लेखात ‘वेळुग्राम’ या नावाचा उल्लेख सापडतो. त्यावरून वेळुग्राम म्हणजे ‘बेळगांव’ या शहरावर प्रथम कदंब राजांची सत्ता असावी. इ. स. 1208 ते 1250 या दरम्यान बेळगांववर राष्ट्रकूट वंशीय राजे राज्य करीत होते. श्रीकृष्णाच्या यादव वंशातून आपली उत्पत्ती झाली असं हे राष्ट्रकूटवंशीय लोक मानत. ते आपल्याला ‘रठ्ठे’ किंवा ‘महारठ्ठे’ म्हणवीत असत. त्यावरूनच महारठ्ठे या शब्दाचे अपभ्रंशरूप ‘मराठे’ असे झाले असावे असे म्हणतात. रठ्ठ, रठ्ठे, महारठ्ठे हे शब्द रथ, रथी, महारथी या शब्दांचे अपभ्रंशरूप शब्द असावेत. या रठ्ठांच्या महामंडलेश्वरांनी आपली राजधानी वेणुग्राम येथे आणली असा बोध हण्णेगेरी येथील शिलालेखनावरून होतो. हे रठ्ठ बेळगांवचे स्वतंत्र राजे होते (बेळगांव नगरीच्या जडणघडणीचा हा रोचक इतिहास अनेक संदर्भ पाहून आणि पुरावे धुंडाळून श्री. मो. ग. कुंटे यांनी लिहिलेला. हा लेख मुद्दाम स्मरणिकेत समाविष्ट करीत आहोत.).
इ. स. 1250 ते 1327 या काळात बेळगांव शहर देवगिरीच्या यादवांच्या अंमलाखाली आले. यांच्या अंमदानीत विद्या व कला यांची वाढ झाली. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे कर्ते ज्ञानेश्वर महाराज हे देवगिरीचा शेवटचा राजा रामदेवराव याच्या कारकीर्दीत होऊन गेले. रामदेवरावाचा प्रधान हेमाद्रि उर्फ हेमाडपंत याने घरे व देवळे बांधण्यासाठी एक विशिष्ट पद्धत शोधून काढली. मोडीलिपीचा शोधक हाच होयं इ. स. 1327 ते 1472 या काळात दिल्लीचा सुलतान महंमद तुघलक याने दक्षिण भारतावर स्वारी केली. हुक्केरी व रायबाग येथे त्याने आपले दोन सरदार नेमले. मात्र बेळगांवचा किल्ला व त्याच्या सभोवतालचा भूभाग विजयनगरच्या साम्राज्यातील एका हिंदु सरदाराच्याच ताब्यात राहिला. इ. स. 1472 साली गुलबर्गाचा महंमदशहा बहामनी बेळगांव शहरावर चाल करून आला. त्यावेळी बेळगांवला विक्रमराय नांवाचा हिंदुराजा होता. राजा विक्रमराय यानं किल्ल्याचं रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्यांत त्याला यश आले नाही. बेळगांवच्या भुईकोट किल्ल्याच्या तटाला सुरुंग लावून भगदाडे पाडण्याचे तंत्र दक्षिणेत पहिल्यांदा याच लढाईत उपयोगात आणले गेले त्यामुळे किल्ला व शहर पडले. या लढाईत मनुष्य हानीही जबर झाली. मग महंमदशहाने येथील व्यवस्था व कारभार पाहण्याची जबाबदारी आपला वजीर महंमद गवान याच्याकडे सोपविली.
इ. स. 1472 व 73 ही दोन वर्षे बेळगांवच्या इतिहासात मानवी आणि नैसर्गिक संकटांनी कहर करून टाकणारी ठरली. या दोनच वर्षात बेळगांव शहराची व येथील रहिवाश्यांची पार दुर्दशा होऊन गेली. याचवर्षी या भागात पावसा अभावी भयंकर दुष्काळ पडला. लढाईमुळं सत्ता गेली. जबर मनुष्य हानीही झाली. त्यामुळं राहिलेल्या लोकात शेकडो भूकबळी झाले. काही लोक देशांतरास गेले. 1474 साली खूप पाऊस झाला परंतु जमीन कसण्यास लागणारे मनुष्यबळ नाहीसे झाले. बेळगांवच्या किल्ला व शहर वजीर महंमदगवान याच्या अखत्यारीखाली आले. त्याचा अंमल इ. स. 1510 पर्यंत टिकला. त्या अवधीत वजीराने बेळगांव शहराची घडी नीट बसविण्याचा प्रयत्न केला पण इ. स. 1511 मध्ये तिकडे बहामनी राज्याचीच शकले उडाली. त्याचा फायदा बहामनी राज्यातून फुटून स्वतंत्र बनलेल्या विजापूरच्या ईस्माइल आदिलशहा नावाच्या बादशहाने घेतला.
इ. स. 1510 व 11 मध्ये अल्फान्सो अल्बुकर्कने गोवा प्रांतावर स्वारी करून तो जिंकला आणि ठिकठिकाणी मुसलमानांच्यावरही विजय मिळविला. हे कळताच बेळगांवच्या नागरिकांनी आपली राजनिष्ठा विजयनगरच्या कृष्णदेवरायाशी जाहीर केली. परंतु तेवढ्यात विजापूरच्या बादशहा ईस्माईल आदिलशहा याला ज्याने एका संकटातून वाचविले त्या खुश्रुतुर्क नावाच्या एका शियापंथी इराणी सरदाराला बेळगांवची सनद देऊन त्याला इकडे पाठविले व बेळगांव शहराचा कारभार त्याच्याकडे सोपविला. हा ईस्माइल आदिलशहा एका कपट कारस्थानात सापडला होता. त्या कारस्थानातून खुश्रुतुर्कने त्याची सुटका केली होती. ईस्माइल आदिलशहाने खुश्रुतुर्कला ‘आसदखान’ हा किताब बहाल केला होता. (आसद म्हणजे सिंह). इ. स. 1549 पर्यंत या आसदखानने बेळगांव शहराचा कारभार उत्तमरीतीने चालविला. त्यामुळे तो सर्व जमातींच्या लोकात प्रिय झाला होता. हा आसदखान मंडोळी गावी वारला, पण त्याचा दफनविधि बेळगांवात झाला. बेळगावच्या कँप हद्दीत ‘आसदखान दर्गा’ ज्याला म्हणतात. तीच ती जागा. या दर्याचा दर्शनी भाग एका ब्राह्मण गृहस्थाने बांधलेला आहे असं सांगतात. या दर्याचे मुजावर त्याचे वंशज आहेत असे म्हणतात.
इ. स. 1550 मध्ये कोणा एका शेरखानाने शहापूर येथे शहापेठ नावाने एक पेठ वसविली असं सांगतात. बेळगांव शहर व किल्लाभाग यांचीही हीच बाजारपेठ होती.
फिंच नांवाचा एक इंग्रज प्रवासी येथे येऊन गेला. त्याने आपल्या डायरीत नोंद केली आहे की ‘बेळगांव हे शहर गोवा आणि विजापूर यांच्या दरम्यानचे पहिले मोठे शहर आहे. येथे हिरे, माणके, नीला, पाचू वगैरे सारख्या रत्नांचा मोठा व्यापार चालतो. येथील रत्नपारखी प्रसिद्ध आहेत. व्यापारी वर्ग सधन असून ते सर्व शहापूर भागात राहतात. येथील सराफी पेठ या दक्खन (दख्खन) भागात फार प्रसिद्ध आहे.
इ. स. 1580 मध्ये विजापुरात दुसरा इब्राहिम आदिलशहा हा बादशहा होता. त्याच्या एका भावाचे नांव ईस्माइल, पण हा ईस्माइल इ. स. 1511 मध्ये खुश्रुतुर्क उर्फ आसदखान या इराणी सरदाराला बेळगांवची सुभेदारी देणारा बादशहा ईस्माइल नव्हे. या ईस्माइलने बादशहा दुसरा इब्राहिम आदिलशहा याच्या विरुद्ध बंडखोरी केली म्हणून त्याने त्याला अटक केली व बेळगांवच्या किल्ल्यात आणून ठेवले. बेळगांवच्या किल्ल्यात ठेवलेला हा पहिला राजबंदी होय. हा 13 वर्षे इथं अटकेत होता.
Belgaum History Asadkhan Darga Camp belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum History Asadkhan Darga Camp
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements