बेळगाव—belgavkar : बेळगांव नगरीच्या जडणघडणीचा हा रोचक इतिहास अनेक संदर्भ पाहून आणि पुरावे धुंडाळून श्री. मो. ग. कुंटे यांनी लिहिलेला. हा लेख मुद्दाम स्मरणिकेत समाविष्ट करीत आहोत.
मो. ग. कुंटे ‘यशवंत’
वेणू हा संस्कृत शब्द आहे. वेणू म्हणजे वेळू. ग्राम म्हणजे गाव. या गावाची पहिली वसाहत वेळूच्या (कळकांच्या) बेटांनी वेढलेली होती म्हणून या वसाहतीस ‘वेणुग्राम‘ हे नांव पडले असावे. वेणू या अर्थी प्राकृत भाषेत वेळू किंवा बेळ हे शब्द वापरले जातात. हे दोन्ही शब्द मराठी व कन्नड भाषेला जवळचे असल्याने ‘वेणुग्राम’ या नावात बदल होऊन ‘बेळगांव’ हे नाव पुढे रूढ झाले असावे. बेळगांव शहर थोड्याशा खोलगट पण पठारी प्रदेशात वसले आहे. ऊन – वारा पाऊस यांमुळे जमिनीची धूप होते आणि जमिनीस खोलगटपणा येतो. तरीसुद्धा समुद्रसपाटीपासून या शहराची उंची 2453 फूट आहे (मीटर 736). बेळगांव हे शहर भौगोलिक दृष्टीने तीन राज्यांच्या सीमावर्ती आहे. एकीकडे महाराष्ट्र, शेजारी गोवा, आणि दक्षिणेला कर्नाटक, ही ती तीन राज्ये होत.
बेळगांव शहर सह्याद्री पर्वताच्या पूर्व बाजूकडील उतरत्या घाट प्रदेशात वसलेले आहे. ते नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळणाऱ्या पर्जन्य छायेखाली येत असल्याने येथील वार्षिक पर्जन्यमान चाळीस ते साठ इंच असते. एखाद्यावर्षी हे प्रमाण अधिक वाढते. त्यामुळे येथे एप्रिल – मे पासून सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत सहा-सात महिने पाऊस असतो. त्यामुळे या सहा-सात महिन्यात येथील हवामान बांबट म्हणजे दमट-पावसाळी असते आणि जमीनही बांबरी म्हणजे दलदलीची किंवा ‘बांबुळी‘ म्हणजे शेवाळी बनते. यामुळे बेळगांव शहराच्या भूगर्भात पाण्याचा साठा भरपूर प्रमाणात असतो. (तसा तो पूर्वी होता.) अलिकडील अर्धशतकाच्या काळात बेळगांव शहराची सुंदर नैसर्गिक रचना बिघडून गेली आहे. या शहराचा अनिर्बंधपणे विस्तार झाला व ते विस्कळित झाले आहे. अर्धशतकामागे बेळगांवच्या पाण्याबद्दल एक प्रकारची विशेष ख्याती होती. येथील पाणी अत्यंत शुद्ध – गोडे – रुचकर व पाचक म्हणून त्याची सर्वत्र प्रसिद्धी होती.
एक उदाहरण म्हणून सांगतो. शहापूरच्या फुले रोडवर बोळमल यांचा जुना बंगला आहे. त्याच्या समोर एक लहानशीच चौकोनी आकाराची विहीर आहे. तिला ‘टक्क्याची विहीर’ म्हणत. केवळ पिण्याकरता म्हणून या विहिरीचे पाणी संपूर्ण कचेरी गल्ली व मिरापूर गल्लीतील लोक घेऊन जात असत. मिरापूर गल्लीतील प्रसिद्ध रेशीम व सूत व्यापारी व्ही. डी. मग्गावी एकदा बोलता बोलता मजजवळ म्हणाले की काही दिवस या टक्क्याच्या विहिरीचे पाणी आपण सांगलीचे गजानन मिलचे धनी वेलणकर यांच्याकरता पाठवीत होतो. अर्ध शतकापूर्वी बेळगांव – शहापूर – वडगाव – अनगोळ या टापूतील प्रत्येकाच्या घरी मागील दारी परसूमध्ये किंवा पुढील दारी अंगणात लहान चौकोनी अगर गोल आकाराची गोड्या पाण्याची विहीर असायचीच. विहीरींना 40/50 फुटावर भरपूर पाणी असायचे. बाजारात दोर विकत घेण्यास गेलं तर 40 फुटी का 50 म्हणून दुकानदार गिऱ्हाईकाला विचारत असत. पावसाळ्यात तर खाली टाकून हातानं घागरीत पाणी घेता येत असे.
बेळगांव शहराची वसाहत प्राचीन असावी. सिंधु संस्कृतीच्या काळात भारत खंडाच्या उत्तर भागातून दक्षिणेकडे जाणारे आणि दक्षिणेकडून उत्तर भारतात जाणारे तडीतापडी (ऋषिमुनि, बैरागी, गोसावी, संन्यासी) आणि कापडी (कावड घेऊन जाणारे यात्रेकरू) स्नानासाठी, पिण्याचे पाणी भरून घेण्यासाठी, कपडे धुण्यासाठी याच वसाहतीत मुक्काम करीत असत. या सगळ्यांचे मोठे मोठे जथे असत. त्याकाळी या वसाहती भोवती अनेक तलाव व खडकात खोदलेल्या विहिरी असत. किल्याजवळचा तलाव, अर्गन तलाव, नागझरी तलाव, जक्कनहोंड तलाव, कपिलेश्वर तलाव, तुर्कमट्टी तलाव, आणि माळमारुती देवालयाजवळची विहीर, घुमटमाळ मारुती मंदिराजवळची विहीर आणि खासबाग जवळच्या उत्खननात सापडलेली विहीर, या विहिरी आणि हे तलाव त्यावेळच्या तलावांची खडकातील विहिरीची साक्ष देतात. यात्रेकरू व गोसावी – बैरागी यांचे जथे माळ मारुती, घुमटमाळ मारुती, खासबागमधील सांपडलेले शिवालय, जत्तीमठ, गांवातील मोठे मारुती मंदीर व कपिलेश्वर मंदिर येथे तळ ठोकत असत. त्या काळापासून कपिलेश्वर हे पवित्र तीर्थाचे ठिकाण म्हणून ओळखले जात होते.
डोंगरांच्या सान्निध्यामुळे या भागात जंगले बरीच आहेत. जंगल संपत्ती बरोबर बॉक्सॉइट सारखी खनिज संपत्तीही बरीच आहे. पावसाळ्यातील दमट हवामान सोडले तर हिवाळा व उन्हाळ्यातील येथील हवामान थंड, उत्साहवर्धक व प्रसन्नता देणारे होते म्हणून या शहराला ‘गरिबांचे महाबळेश्वर‘ म्हणत. पावसाळ्यातील दमट हवासुद्धा त्रासदायक न वाटता सुखावहच वाटत असे. असे हवामान आणि स्वस्त राहणीमान म्हणून पूर्वीचे स्थानिक व दादासाहेब खापर्डे यांच्या सारखे सधन व शौकिन लोक उन्हाळ्यात बेळगांवला राहायला येत असत. त्याकाळी इथ डासांचा प्रादुर्भाव नव्हता असे सांगतात.
बेळगांव भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मंडळींना चालत सहलीस जावं असं वाटलं तर जवळच बेळगांवचा ‘भुईकोट किल्ला’ आणि येळ्ळूर जवळचा शिवकालीन डोंगरी ‘राजहंस गड’ ही ऐतिहासिक ठिकाणे आहेत. बेळगांवचा विमानतळ व त्याच्यापुढे पंत बाळेकुंद्री येथे संतांची समाधी असलेले शांत ठिकाण आहे. सधन लोकांच्यासाठी अंबोली घाट हे रम्य ठिकाण आहे. निसर्गसौंदर्य पाहायचं असेल तर तीर्थकुंडे, सोगल, कणबर्गीचे सिद्धेश्वर मंदिर व वैजनाथ देवालय, हिडकल डॅम अशी डोंगरावरील निसर्गसुंदर स्थळे आहेत. वैजनाथ हे शिवस्थान आहे. शिव याचा अर्थ निसर्ग असाही आहे. निसर्ग आणि शिवशंकर यांचं एकत्रित दर्शन इथं घडतं म्हणून या भागातील लोक महाशिवरात्रीच्या दिवशी वैजनाथ व खानापूर जवळील मलप्रभा नदीकाठच्या असोगा या ठिकाणी बहुसंख्येने जातात. बेळगांव जवळील वैजनाथ हे दत्तस्थान म्हणून ही ओळखले जात होते असा उल्लेख श्री. कुलकर्णी कृत ‘गुरुचरित्र अभ्यास’ या पुस्तकात आहे.
Belgaum City Information Areas Temples belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum City Information Areas Temples
Belgaum City Information Areas Temples
Belgaum City Information Areas Temples
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements